किमया पळस फुलांची ..... ! प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 12, 2020

किमया पळस फुलांची ..... ! प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे

किमया पळस फुलांची ..... !
प्राचार्य डॉ सुजितकुमार टेटे






बहरलेली फुले पाहिली कि मन हि कसे बहरून येते. शहरातील विविध भागात पद पथावर नानाविध वृक्ष वेगवेगळ्या मोसमात स्वतःच्याच धूंदीत बहरत असतात आणि लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच शहरात फिरताना एका बाजूला कॉक्रीटचे जंगल तर त्यालाच लागून ग्रामीण खेड्यातील अद्भुत वृक्ष संपदा मनाला भावते. यातच रस्त्याच्या कडेला पळसाचे फुललेले झाड दिसले आणि क्षणात माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

या शहरातल्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी बेगडी फुलांनी जरी मनाला  भुरळ घातली असली तरी गावचे गावपण मी अजून विसरलेलो नाही. माझ्या लहानपणी मला सर्वात जास्त पळसाची फूले आवडायची. तशी पळसाची आणि माझी पहिली ओळख म्हणायचे तर माझ्या शेताकडे जाणाऱ्या पांदन रस्त्याच्या दुतर्फा  मोठमोठे असलेल्या पळसाच्या झाडाने झाली. बैलगाडीतून जाता येता त्या पळसाची फूल माझ्या बालमनावर भुरळ घालायचे. ते केवळ मलाच भुरळ घालत नसावेत तर सभोवताली पसरलेल्या काळा आईलाही त्यांच्या त्या देखणेपणाचा हेवा वाटत असावा. ज्यावेळी रानवनातील गवतं वाळून गेलेली असते आणि झाडांच्या पानाने गळून पडून वैराग्य धारण केलेले असतं याच काळात निष्पर्ण झालेले पळसाचे झाड फूलांच्या बहराने लकडून गेलेले असते. पळसाला पाने तीन असे जर म्हटले तर ते माणसाच्या बाबतीत तिचकच खरे आहे. बदल जरी काळाची गरज असली तरी काही गोष्टी या जगाच्या पाठीवर  कोठेही जा त्या बदलत नाही. बहूधा यामुळेच सभोतालच्या समाजातील बदल हे हळूवारपणे प्रतिबिंबत होत असले तरी काही गोष्टींची मूळे खुप खोलवर रूतलेली आहेत. हेच तर पळसाच्या झाडाची पाने  सांगत असावेत नाही ?



पळसाच्या फुलांपासून रंग बनवण्याचा आनंद अवर्णनीय आहे. आजही होळीच्या सणाला गावाकडे गेलो कि या पळसाच्या फुलांच्या रंगाची झाकलं बघायलाच मिळते. लहानपणी आणि आता सुद्धा गावातील लग्नाच्या कार्यक्रमात  पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळीवर जेवताना करावी लागणारी कसरत निराळीच होती. पत्रावळी फाटकी आली की वाढेक-याला दूसरी मागायची आणि द्रोणला जर छिद्रं असले तर मग वरणाची गंगामाय वाहून जायची पण या सार्वजनिक पंगतीतला जेवणाचा आनंद काही औरच होता.आता त्या पानाच्या पत्रावळीची अन् द्रोणांची जागा जागतिकीकरणाच्या युगात प्लास्टिकच्या पत्रवाळीने घेतलीआहे.आता ते दिवस फक्त आठवणीत जमा झालेत पण बांधाबाधांवरील पांढरं रस्त्याच्या दुतर्फा असलेली पळसाची झाडे आता खूप कमी झालेली दिसतात.  पळसाची झाडतरी पहिल्यासारखी आता कुठ राहलीत. दिवसेन दिवस वाढणाऱ्या लोकसंख्याच्या बरोबर जमीन कुठे वाढतेय ? जमीनीचे होत असलेले तुकडीकरणामूळे बांधाबाधांवरील झाडावर ही कु-हाड चालवली जाते. गावाच्या काळ्या मातीत वाढलेले, बहरलेले पळसाचे झाड रांगडेपणा आणि रानदांडगेपणा दाखवते यात शंकाच नाही. या झाडाचे संवर्धन आणि जोपासना करणे काळाची गरज आहे. नाहीतर आपल्या येणा-या पिढीला या रांगड्या अन् मनमोहक फूललेला पळसाच्या झाडाला पाहण्यापासून मुकावे लागेल.



पळसाच्या फुलाची किमया दररोज मनाला मोहून घेते. शाळेतील गॅलरी मध्ये उभे राहून शेतातील रानमालाकडे नजर गेली कि तिथे दूर वर पळसाचे बहरलेलं झाड दिसते आणि त्या पळसाच्या झाडावर बालपणी घालविलेल्या आठवणी ताज्या होतात. आजोबा सोबत शेतात जाणे आणि पळसाच्या फुलाचा गोड रस अनुभवणे आणि फुलाच्या आतील पांढऱ्या रंगाच्या पाईप ची पिंपाळी करून स्पर्धा करणे या गोष्टी आणि आठवणी ताज्या होतात.


आपल्या फांद्याफांद्यांवर लाल केशरी आणि नारंगी रंगाची पोपटाच्या चोचीसारखी फुलं मिरवणारा पळस हे साधारण मध्यम आकाराचं झाड असतं.पळस घेरदार होत नाही. याची पानं चांगली मोठय़ा देठाची असतात. मूळ फांदीपासून दहा ते बारा से.मी. आकाराच्या त्रिदल पर्णिकेला साधारण दहा ते पंधरा से.मी. लांब ठेवणारा याचा देठ अगदी नजरेत भरेल असाच असतो. ही तीनच असणारी पानं अगदी काळपट हिरव्या रंगाची असतात. या पानांची गम्मत म्हणजे, ज्याप्रमाणे बेलाच्या त्रिवेणीचं मिळून एक पान बनतं, तसंच पळसाच्या तीन पर्णिकांचं मिळून एक पान बनतं. म्हणजे, पळसाला पाने तीनऐवजी पळसाच्या पर्णिका तीन अशी म्हण असायला हरकत नाही. पोपटाच्या चोचीसारखीच वाकडी असणारी ही फुलं साधारण बोटाच्या पेरांपासून तळहातापर्यंत मोठी असतात. याच्या पाच-सहा सेमी लांब पाकळ्या तरल मुलायम असतात. अतिशय भडक व चित्ताकर्षक लाल रंगाच्या या फुलांमध्ये भरपूर मधुररस असतो. पळसाचं झाड पूर्ण बहराला आलं की ही फुलं परिसरातल्या किडय़ांना, खारींना, पक्ष्यांना मधुररस प्राशनाला येण्याचं आवतण देतात. बरेचदा सकाळच्या कोवळ्या उन्हात  माकडांच्या टोळ्या पळसाच्या कोवळ्या कळ्या आणि फुलांच्या जोडीला फांद्यांवर आलेली कोवळी पालवी आणि कुठे आलेल्या शेंगांचा नाश्ता करताना बघणं म्हणजे निव्वळ नेत्रसुखद असतं. पळसाच्या शेंगा नजरेत भरणाऱ्या नसतात. या काटेसावरीसारख्या बियांचा पसारा इथेतिथे न करता वाऱ्यावर उडून लांबवर पडतात नि लग्गेच रुजतात.



 अशा बहुगुणी पळसाची फुलं बहरल्यावर त्यातला मधुररस पिण्यासाठी पळसावर जणू आनंदमेळाच भरतो. या आनंदमेळ्यात निसर्गातली देवाणघेवाण होते. आनंदमेळ्यात सहभागी होऊन फुलांचं परागीकरण करणारे पक्षी पळसफुलांमधला रस पितात नि परागकण वाहून नेतात.



दंवयुक्त धुक्याने रब्बी शेतीला जसा जोर येतो तशीच भाजीपाल्याची लागवडही वेगाने केली जाते . निसर्गतः निर्माण होणाऱ्या या आल्हाददायक वातावरणामुळे विविध प्रकारची वृक्षसंपदा देखिल मोहोरुन जाते . याकाळात विविध रंगांची आणि आकाराची फुलं सुष्टीतील प्रत्येक घटकाचे लक्ष वेधून घेतात . पानं गळून पडल्यावर फुलणारी , हिरव्या वनराईत फुलणारी पळस फुलांची वनज्योत हे नजरेचे पारणे फेडणारे दृष्य म्हणजे जणू निसर्गदेवतेने केलेला साजशृंगारच म्हणावा लागेल . गोंदिया जिल्हात सध्या जागोजागी निसर्गाचे असे मनोहारी रुप पाहायला मिळत आहे .



आपल्या जाड पानांनी निसर्गराज्यात स्वतःचे वेगळे अस्तित्व सिध्द करणारा वृक्षराज पळस , आपल्या तीनही अवस्थेत सर्वांचं लक्ष स्वतःकडे वळविण्यात यशस्वी होतो . औषधी वृक्ष म्हणून आयुर्वेदात स्थान असणाऱ्या पळसाची पानं जाडसर असतात . यामुळे पळस सहज ओळखून येतो . मोठ्या शहरांमध्ये पळसाच्या पानांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.


पळसाचं हे निष्पर्ण होवून साधं बनणं काही काळासाठी असतं . थोड्याच कालावधीत तांबूस – केशरी आणि पिवळ्या फुलांनी पळस नवा साज लेवून एखाद्या सौभाग्यवतीला लाजवेल अशा रूपाने निसर्गराज्यातील आपलं वेगळेपण सर्वांसमोर ठेवतो . पोपटाच्या चोची सारखं असणारं पळसाचं फुल म्हणजे जणू सौभाग्यवतीने नाकात परिधान केलेली नथच ! सुंदर आकाराची आणि मनमोहक रंगाची पळस वृक्षाची फुलं हिरव्या निसर्गात दूर अंतरावरूनही सहज लक्ष वेधून घेतात . गोंदिया जिल्हात जागोजागी असे पळस फुलले की , हे दृष्य ‘ रानात फुलली पळसाची वनज्योत ‘ असेच भासते . पळसाची फुलं पक्षांना आणि मधमाशांना आकर्षित करतात . असंख्य पक्षी आणि मधमाशा या फुलांभोवती मध प्राशन करायला घिरख्या घालत असतात .


या निसर्गाची किमया बघून काही ओळी आठवतात ....


‘धुप में निकलो,



घटाओं में नहाकर देखो,



जिंदगी क्या है,




किताबों को हटाकर देखो.’

1 comment:

  1. अप्रतिम शब्दांकन सर ।।।।।

    ReplyDelete

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages