वटपौर्णिमा- नाते सात जन्माचे शब्दांकन: प्राचार्य डॉ सुजित टेटे - काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 4, 2020

वटपौर्णिमा- नाते सात जन्माचे शब्दांकन: प्राचार्य डॉ सुजित टेटे

वटपौर्णिमा- नाते सात जन्माचे
शब्दांकन: प्राचार्य डॉ सुजित टेटे
मो. ९४०५२४१००४

ज्येष्ठ महिना नावाप्रमाणेच सर्व ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा हा महिना. ऋतूचक्रातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो. हा महिना तसा गंभीर, शांत आणि संथही. ग्रीष्माची चाहूल लागलेली, आभाळ भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला, मध्येच पावसाची हलकी सर येणार्‍या पावसाळ्याची आठवण करून देते. उन आणि पावसाळ्याचं 'फ्यूजन' म्हणजे हा महिना. निरोप घेणारा उन्हाळा नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या महिन्यात पाहता येते. अशा या स्वप्नील वातावरणाला धार्मिक अधिष्ठानही लाभले आहे.

ज्येष्ठात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या पौर्णिमेला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्यामागचे वैज्ञानिक महत्त्वही समजून घेणे अगत्याचे आहे. वास्तविक शास्रकारांनी अनेक सण, उत्सवांची रचना त्यातील वैज्ञानिक संदर्भ लक्षात घेऊन केली असावी, असे वाटण्याइतपत या सणांमागे विज्ञान आहे. दुर्देवाने ते जाणून न घेता, केवळ परंपरा म्हणून ते करण्याचा अट्टाहास धरला तर मग शास्रार्थ जाऊन त्याला कर्मकांडाचे स्वरूप येते.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व खालील लेखातून समजून घेऊया.

वटपौर्णिमेचेही तसेच आहे. सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. (मग तो कितीही दुर्गुणी का असेना.)
या व्रतामागचा शास्त्रार्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. वड ही उपयुक्त वनस्पती आहे. डेरेदार अशा या वटवृक्षाच्या आजूबाजूला एक दुनिया वावरत असते. वडामुळे उन, पावसापासून आपले संरक्षण होते. तापल्या उन्हातून जाणारा पांथस्थ वडाखाली थांबतो तेव्हा त्याचा सारा शीण नाहीसा होतो. वडाच्या ढोल्यांमधून कावळे, घार, गिधाड (पर्यावरणाची स्वच्छता करणारे पक्षी) यांच्यासह चिमण्या, पारवे, पोपट आदी पक्षीही राहतात.
वडाची बारीक बारीक फळे हे त्या पक्ष्यांचे अन्न आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व या झाडावरच अवलंबून आहे. झाडांच्या बिया अन्य ठिकाणी रूजून पर्यावरण संवर्धनास पक्ष्यांची मदत होते. परिसरात वडाच्या झाडाचे अस्तित्व असणे हे त्या परिसराचा पर्यावरण समतोल असल्याचे द्योतक आहे.
वडाच्या पारंब्या जमिनीत रूजून नवीन झाड तयार होते. त्यामुळे दाट झाडी तयार होऊन त्याखाली लहान वनस्पती वाढू शकतात. कमी उन मिळणार्‍या भागात या प्रकारच्या वनस्पती वाढतात. वेलींना आधार मिळतो. खाली पडलेल्या, कुजलेल्या पालापाचोळ्यापासून नैसर्गिक, जैविक खत मिळते. वडाची मुळे खूप खोलवर पसरलेली असतात. त्यांची माती धरून ठेवण्याची क्षमताही चांगली असते. त्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते.

वडाचे झाड जंगलात असणे हे त्या जंगलाच्या संपन्नतेचे लक्षण आहे. त्यामुळेच आपल्याकडच्या कितीतरी देवरायांमध्ये वडाच्या झाडाचे प्रमाण लक्षणीय आहे. वडाचे बरेच औषधी उपयोगही आहेत त्यामुळे या वृक्षाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी त्याला पूजेचा मान देऊन त्याचा गौरव केला आहे.

वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे.  हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. यावर्षी  ५ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात.
मात्र यामागे काही शास्त्रीय कारणेही सांगितली जातात. वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते. त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते. याबरोबरच एकमेकींना वाण दिल्याने आपल्याकडून दान केले जाते असेही म्हणतात. वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्षांसाठी जगते त्याचप्रमाणे आपला पतीही दिर्घायुषी व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवल्यास ते वाचते असाही समज आहे.

पौराणिक कथा :
अनेक वर्षापूर्वी अश्वपती नावाचा राजाच्या आपल्या सावित्री या मुलीला तिचा पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्र अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. त्यावेळी सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा एका अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून व्रत केले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने सावित्रीला परत जाण्याची विनंती केली. पण तिने पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने तथास्तु म्हटले आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत करतात असे म्हटले जाते.

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages