ऑनलाइन शिक्षण - Future Investment !
शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे
जर कोरोना संपलाच नाही तर ? जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ? आपण आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार का ? आपण आपल्या मुलांना Online शिक्षण अजिबात देणार नाही का ? विचार करण्यासारखे आहे ना ? अनेक देश कोरोना लसीच्या शोधात आहेत परंतु आताही perfect solution मिळालेला नाही. मग कोरोना संपण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपल्या मुलांना तंत्रज्ञानाची सवय लावणे जे साधने उपलब्ध आहे त्याचा वापर करणे नेहमी फायद्याचे असे मला वाटते.
नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर आपल्याला जायचं आहे, त्या काठावर आपण उभे आहोत आपल्या कडे आपली कार आहे , बसेस आहेत , ऑटो आहेत व बोटी आहेत. आपल्याला किनारा ओलांडण्यासाठी फक्त बोटीचा प्रवास करावा लागेल, आपली कार , बसेस आदी साधने निरर्थच ठरणार ना? सध्याची परिस्थिती देखील किनारा ओलांडण्यासारखी आहे. आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण प्रणालीला सहकार्य करून शिक्षण आत्मसात करायचे आहे असे माझे वयक्तिक मत आहे.
मार्च महिन्यास पासून देशात कोरोनामुळे लॉकडाऊन ची परिस्थिती निर्मण झाली, शाळा बंद पडल्या आणि प्रत्येक प्रत्येक व्हाट्स अँप ग्रुपवर खाजगी शाळा विषयी एक नकारात्मक मोहीमच सुरु झाली. शिक्षणावर केला जाणारा खर्च असतो, ती गुंतवणूक नसते, अशी आपल्या समाजाची मानसिकता तयार झालेली आहे. ऑनलाइन शिक्षण स्वीकारण्यासाठी ही मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. कारण येणार काळ ऑनलाईनच असणार !
मोबाईल रिचार्ज करणे , रेल्वे तिकीट ,सिनेमाची तिकिटे बुक करण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापेक्षा वेबसाइटवरून बुकिंग करणे, शॉपिंग करण्यासाठी ॲमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन दुकानातून मागवणे, दूरवरच्या नातेवाईकांशी व्हिडिओकॉलच्या माध्यमातून बोलणे, मनीऑर्डरच्या ऐवजी गुगल-पे यूपीआय भीमसारख्या पोर्टलचा वापर करणे, हवामानाचा अंदाज घरबसल्या घेणे… याची आता आपल्याला सवय होऊ लागली आहे. या सगळ्यांमधला समान धागा म्हणजे तंत्रज्ञानाने आपल्याला update केलेले असून आता या सर्व ऑनलाइन गोष्टींमध्ये शिकणेही आता डिजिटल होऊ लागले आहे. शिक्षणाची ही नवी व्यवस्था अद्यापही सवयीची पडलेली नसली, तरी ती आता आवश्यक आहे. त्यामुळे तिच्याबद्दल सर्वच बाजूने विचार व्हायला हवा असे मला वाटते.
शिक्षणाचा खराखुरा खर्च
इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू दागदागिने, घरगुती वापराची यंत्रे याबरोबर शिक्षण हे अत्यंत खर्चिक असे माध्यम ठरते. आपण शैक्षणिक बाबींवर केला जाणारा खर्च नियमितपणे नोंदवत नाही. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग-मशीन हे अमुक हजार रुपयांना घेतले व इतके वर्ष वापरले आता नवीन घ्यायला हरकत नाही हे गणित कसे मांडले जाते? तसे शिक्षणाचे मांडण्याची पद्धत आपल्याकडे नाही. इयत्ता पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत साधारण पंधरा ते सतरा वर्षे एखाद्या व्यक्तीचा शैक्षणिक प्रवास सुरू असतो. त्यामध्ये शैक्षणिक साहित्य, संगणक, अभ्यासक्रमाची फी, क्लासेस, प्रवास खर्च, विविध सॉफ्टवेअर यांचा खर्च विचारात घेतला तर शिक्षण हे खासगी खर्चातील महागडे क्षेत्र ठरेल.
नव्वदीनंतरच्या काळात खासगीकरण हळूहळू समाजात रुळायला लागल्यावर शिक्षणक्षेत्र आणि खासगीकरण याचा सहसंबंध हळूहळू दृढ व्हायला लागला. अस्तित्वात असलेल्या सरकारी शाळा आणि नव्याने उदयास आलेल्या खासगी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा महाविद्यालये यांच्या नव्या लाटेत बदलते तंत्रज्ञान मोलाचे ठरले. तांत्रिक बदल आत्मसात करून सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपण जी भरारी घेतली ती डोळ्यासमोर आहे. आता शैक्षणिक क्षेत्रातील नवीन संकल्पना येऊ घातले आहे, ते म्हणजे ऑनलाइन शिक्षण.
ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय?
व्हिडिओ कॉन्फरन्स सारखे लाईव्ह लेक्चरद्वारे ऐकणे म्हणजेच ऑनलाइन शिक्षण असा गैरसमज करून घेण्याचे प्रथम आपण थांबवले पाहिजे. गेल्या महिन्याभरात शहरी भागातील काही शाळांमधून महाविद्यालयांमधून Zoom व Google Meet माध्यमातून ऑनलाइन तासिका भरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हेच ऑनलाइन शिक्षण हा काही जणांचा गैरसमज झालेला आहे. ऑनलाइन शिक्षण याचा सोपा अर्थ तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला घरबसल्या शैक्षणिक सोयी-सुविधा मिळणे. शैक्षणिक संस्थेत न जाता प्रवेशापासून डिग्रीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण इंटरनेट या माध्यमातून मिळवू शकतो. यात पुढील बाबींचा समावेश होतो
प्रवेश प्रक्रिया डिजिटल असणे, पुस्तके व शैक्षणिक साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळणे, विषय शिकवताना ज्या संकल्पना महत्त्वाच्या असतात त्यांचे सहा ते सात मिनिटाचे छोटे व्हिडिओ युट्युब सारख्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचविणे, ई-पुस्तके वाचण्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करणे, छापील पुस्तकांच्या डिजिटल आवृत्त्या तयार करणे, जसे प्रत्यक्ष वर्ग भरतात, तसे ऑनलाइन माध्यमातून वर्ग भरवणे, E-content वाचून किंवा बघून विद्यार्थ्यांना ज्या शंका उत्पन्न होतात त्याचे निराकरण करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यात थेट सुसंवाद घडवून आणणे, सत्राच्या शेवटी ऑनलाईन माध्यमातून परीक्षा घेणे, त्या परीक्षेसाठीचे प्रश्न कसे असतील त्याची उत्तरे विद्यार्थ्यांनी कशी लिहिणे अपेक्षित आहे त्याचे मूल्यमापन कसे केले जाईल याविषयी आराखडा बनवणे, परीक्षा आराखड्यानुसार त्या परीक्षा प्रत्यक्ष ऑनलाईन घेण्यासाठी पोर्टल सॉफ्टवेअर तयार करणे, एकाच वेळी परीक्षा घेता येतील अशा प्रकारची वेळापत्रकाची आखणी करणे.
भारतातील तंत्रज्ञानाचा विकास व सद्यस्थिती
सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली कुशल व अकुशल भारतीयांनी कमालीची मेहनत घेऊन संदेशवहन जाळे पहिल्यांदा अस्तित्वात आणले. १९८५ नंतर माहिती तंत्रज्ञान हा एक नवीन उद्योग अस्तित्वात येऊ शकतो, याची पहिल्यांदा आपल्याला जाणीव झाली. स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला नवे संधींचे आभाळ खुणावू लागले. भारतात संगणक आणण्यासाठी किती बौद्धिक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागला हे आपल्या कल्पनेपलीकडचे आहे.
आजच्या ऑनलाईन शिक्षणाच्या विषयाशी या गोष्टींचा संबंध काय? असा प्रश्न वाचक म्हणून तुम्हाला पडणे हे स्वाभाविक आहे. पण, यातून इतकच सूचित करायचे आहे की, एखादा नवीन प्रयोग येऊ घातलेला असतो तेव्हा त्यात जितक्या अडचणी येतात तितकाच तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरतो. हा इतिहास आहे! ऑनलाइन शिक्षण हे त्याच मार्गाने जाईल असे वाटते.
ऑनलाइन शिक्षण आणि नकारात्मक मनोवृत्ती
भारतात फक्त निम्म्या घरातच इंटरनेट आहे, सर्व विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप स्मार्टफोन असेलच असे नाही, मग ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात करण्याची आता गरज आहे का? असा प्रश्न निश्चितपणे विचारला जाईल. ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थी लक्ष देऊन शिकतील का? आणि तसे नसेल तर कशाला हवे ऑनलाइन शिक्षण? अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत असताना लोकांकडे जगायला पैसे नाहीत आणि कशाला हवे ऑनलाइन शिक्षण?
शिक्षणावरील खर्च आणि मनोवृत्ती
वार्षिक स्नेहसंमेलने, वाढदिवस, मित्रपरिवाराबरोबर सहलीला जाणे, महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळेला हॉटेलमध्ये जेवायला जाणे, विविध सणाच्या निमित्ताने कपडेलत्ते, गृहोपयोगी वस्तू यांची खरेदी करणे, लग्नकार्यासाठी सोने खरेदी करून ठेवणे, यात काहीही गैर नाही, असे मानणारा समाज दर महिन्याला पाचशे रुपये वेगवान इंटरनेटसाठी खर्च करायला सहजासहजी तयार नसतो. आपल्या मुलाला वाढदिवसाला टू व्हीलर द्यायच्या ऐवजी एखादा दर्जेदार लॅपटॉप का देत नाही? कारण शिक्षण क्षेत्रात केला जाणारा खर्च असतो ही गुंतवणूक नसते ही समाजाची मानसिकता आहे.
शिक्षणाचा उद्देश चहूबाजूंनी मिळणारे ज्ञान आत्मसात करणे व त्यातून आपले उत्तम व्यक्तिमत्व घडवणे आहे, हा आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा जेवढा वापर होऊ शकतो, तेवढा अन्य कशाचाही होऊ शकत नाही. यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी पालक वर्गाचे प्रबोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टॅब वापरणे सोयीस्कर नाही. ज्यांचे पालक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असतात त्यांच्याबाबतीत या शैक्षणिक साधनांचा दुरुपयोग होणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जाते ही पूर्णपणे सत्य आहे. यावर उत्तम उपाय म्हणजे जसे विद्यार्थी कार्टून, मराठी मालिका, खेळ टीव्हीवर बघतात त्याप्रमाणे त्यांनी वेळापत्रकानुसार शिक्षण घ्यायचे. शिक्षण संस्थांच्या गळ्यात जबाबदारी टाकून आपण मोकळे होऊ ही मनोवृत्ती चालणार नाही.
डिजिटल शिक्षण सर्वांसाठी !
सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही माध्यमातून शिक्षण घेणे तसे कठीणच आहे. दारिद्ररेषेखालील विद्यार्थ्यांची स्थिती पाहता, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी पाहता सरसकट समाजातील सर्व थरातील विद्यार्थी ऑनलाईन माध्यमाकडे वळतील असे निश्चितच होणार नाही. पण सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार नाही म्हणून जे लाभ घेऊ इच्छितात, त्यांनाही त्यापासून वंचित ठेवणे हा दुर्दैवी हट्ट धरणे अजिबात योग्य नाही.
No comments:
Post a Comment