शब्दांकन:
प्राचार्य, डॉ सुजितकुमार टेटे
मेरा भोला है भंडारी या गितानी सोशल मीडियावर छाप सोडली आहे आणि याच भोला भंडारी म्हणजेच महादेवाचा आज सण.
देवदेवतांच्या नावाने साजरे केले जाणारे भारतातील जवळपास सर्व सण, उत्सव दिवसा साजरे केले जातात. नवरात्र आणि महाशिवरात्र मात्र त्याला अपवाद आहेत. महादेवाच्या तेजाचे, तपाचे, वैराग्याचे प्रतीक आठवण्यासाठी महाशिवरात्र साजरी केली जाते.
माघ महिन्यात येणारी महाशिवरात्र शिवभक्तांसाठी एक आध्यात्मिक पर्वणीच असते. महाशिवरात्रीला महादेवाचे सकाम भावना घेऊन व्रत केल्यास भक्तांच्या सर्व कामना पूर्ण होतात, तर निष्काम भावनेने केल्यास मोक्ष मिळतो, असे शिवपुराण सांगते. महाशिवरात्रीला पृथ्वीवरील महादेवाच्या सर्व पिंडींना ईश्वराचे चैतन्य मिळून त्या पुन्हा तेजतत्त्व धारण करतात, हेच महाशिवरात्रीचे खरे रहस्य असल्याचे बोलले जाते. केवळ जलाभिषेकानेदेखील भगवान शिवशंकराची आराधना पूर्ण होत असल्याची शिवभक्तांची भावना आहे.
महाशिवरात्रीसंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते...
विंध्य पर्वतावरील व्याधाच्या हातून अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्र असताना तो शिकारीसाठी निघाला. रस्त्यात एक सजवलेले शिवालय आणि तेथील शिवभक्तांची गर्दी पाहून शिकारी थांबला. शिवपूजेचा सोहळा पाहून तो शिवभक्तांना हसू लागला. पुढे जंगलात खूप वेळ घालवूनही त्याला शिकार मिळाली नाही. त्याला उपवास घडला. शिकार दिसावी म्हणून तो झाडावर चढला. ते बेलाचे झाड होते. वेळ जाईना म्हणून तो (शिवभक्त शिवालयात म्हणत होते तसे) ‘हर हर.. शिव शिव’ म्हणू लागला. सावजाची वाट पाहत तो बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. ती झाडाखालच्या पिंडीवर पडत होती. त्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणावर बाण रोखताच हरीण म्हणाले, ‘मी गर्भवती आहे. मला मारू नका. बाळाला जन्म देऊन परत येईन.’ त्याने त्या हरणाची शिकार केली नाही. त्या वेळी तेथे शिवाचे दूत येऊन म्हणाले, ‘आज महाशिवरात्री आहे, तुला सहज जागरण व उपवास घडला. तू शिवभक्ती कर, तुला मोक्ष मिळेल.’ पुढे त्याने शिवजप करून मोक्ष मिळवल्याचे सांगितले जाते.
त्रिमूर्ती म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी या जगाची निर्मिती केली असे म्हटले जाते. त्यातील महेश म्हणजे भगवान शंकर हे आहेत. शंकर देवाचे महत्त्व सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त आहे. महादेव म्हणजेच सर्वात महान देव म्हणून देखील शंकराला ओळखले जाते. त्यांचे केस मनाचे प्रतिक मानतात, त्यांचे त्रिशूल मनावर नियंत्रण करतो, त्यांचे ध्यान शांततेचे प्रतिक आहे आणि त्यांच्या गळ्यातील सर्प हा आपला अहंकार त्याग करण्याचे प्रतिक आहे.
त्यांच्या दैवी सामर्थ्याबद्दल काही वेगळे सांगण्याची गरज नाही. जगातील सर्व दुष्टांचा नाश करणारा देवता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. विविध पौराणिक पुरावे आणि श्लोक आहेत, जे भगवान शिव यांच्या अस्तित्वाबद्दल विविध कथांचे वर्णन करतात. आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्येकाने काहीतरी वेगळे त्यांच्याबद्दल लिहिलेले आहे. पण आज आपण भगवान शंकरांबद्दल काही वेगळ्या बाबी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.
भगवान शंकरांच्या कथा वाचताना वाचकांच्या मनात, नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की, भगवान शंकरांचे वडील कोण होते ? यावर सर्वांचा एकच समज आहे की, भगवान शंकरांना पालक नव्हते. भगवान शंकरांना अनादि असे संबोधले जाते. अनादि शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे की, ज्याला कोणतीही सुरुवात वा अंत नाही. भगवान शंकराला प्रारंभ नव्हता. ते जन्म आणि मृत्युच्या पलीकडे आहेत.
भगवान शंकर यांच्या जन्माविषयी अजून एक मनोरंजक कथा आहे, एकदा भगवान ब्रम्हा आणि भगवान विष्णू सर्वात शक्तिशाली कोण, यावर वाद घालत होते. ह्याचवेळी अचानक प्रकाशाचा एक तेजस्वी खांब दिसू लागला. हा खांब एका क्षितिजापासून दुसऱ्या क्षितिजापर्यंत लांब होता आणि या दोन्ही देवांना या खांबाची सुरुवात आणि शेवट शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे ते बुचकळ्यात पडले, यामुळे त्यांचा एकच गोंधळ उडाला होता. याच खांबामधून भगवान शंकर प्रकटले होते. हे सिद्ध करते की, त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा आणि जन्माचा संबंध त्यांच्याकडे नाही आहे.
भारतभरात आज महाशिवरात्री साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणांचे ते प्राशन करतात पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस शिवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो.
काही जणांना दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते किंवा अनेकांना १६ सोमवरांचे व्रत करता येत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. महाशिवारात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केल्यास अडी अडचणी दूर होतात, महादेव प्रसन्न होतात. काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.
महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी आजचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून त्याला ते अर्पण केले जाता. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. त्याला बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.
No comments:
Post a Comment