- काव्यलहरी

डॉ.सुजीतकुमार टेटे

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 20, 2019

मनस्तापाचे खरे कारण अपेक्षा ?

शब्दांकन- प्राचार्य, डॉ.  सुजितकुमार एच टेटे 

‘मी शेवटचा कधी बरं मनमोकळं हसलो होतो?’ स्वतःलाच प्रश्‍न विचारून बघा. दररोजच्या कृत्रिम जगण्यात आपण किती गुरफटून गेलोय, याची जाणीव होईल. मनमोकळं राहिल्याने मन प्रसन्न होते. मन प्रसन्न असले तर जीवनात चैतन्य संचारतं. प्रसन्नता आणि चैतन्य नुसतं आपलं जीवन सुलभ करत नाही तर आपल्या परिवाराचंही जगणं सुंदर बनवतं. प्रसन्न मन स्वर्गाची अनुभुती देणारं आहे, तर दुःखी मन म्हणजे साक्षात नर्क. तरीही आपण मन मारून का जगत असतो. जबाबदारी, संकट, प्रश्न, काम, समस्या फक्त आपल्याच वाट्याला आल्यात का? अजिबात नाही.
जीवनातील चढ-उतार या गोष्टी पासून कुणीच चुकले नाहीत, त्यापुढे आपली काय गत. थोडक्यात सांगायचं तर, अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन हा वाळवंटातील म्रुगजळाप्रमाणे एक भ्रम आहे. त्यामुळे, अडचणींच्या ओझ्याखाली ‘मन’मारुन जगण्यापेक्षा अडचणी पेलून त्यावर मात करण्याचा ‘मना’पासून प्रयत्न करायला हवा. मनाची ताकद फार मोठी आहे. मनावर सत्ता मिळवून अनेक लोकांनी  जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाचे गमक मन हेच आहे. मनापासून केलेलं कोणतेही कार्य सिद्धीस जाते. त्यामुळे आपलं मन प्रसन्न असायला हवं. मनाची प्रसन्नता लढण्याची सकरात्मक शक्ती आपल्या पाठीशी उभी करते. म्हणून तर संत महात्म्यांनी मनाला आवर घालून त्याला प्रसन्न करण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे. 
 संत तुकाराम महाराजांनी “मन करारे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण” या अभंगातून मनाची प्रसन्नता आपल्या सर्व सिद्धीचे कारण असल्याचं सांगितलंय. आपलं मन हे एक दैवत आहे.. या मनो दैवताला प्रसन्न केलं तर कुठलंही कार्य सिद्दीस जाण्यास वेळ लागत नाही, म्हणून मनाला प्रसन्न करण्याचा उपदेश महाराज करतात.
सध्याचं युग हे प्रचंड स्पर्धेचं आणि तंत्रज्ञानाचं युग. गतीची भयंकर सक्ती असलेला काळ. ‘थांबला तो संपला’ हा नियम बनवून प्रत्येकजण धावत सुटलाय. कुणाला कुणाशी बोलायलासुद्धा वेळ नाही.  स्पर्धा आणि पैशाची हाव, यातच आपण गुरफटून गेलोय. बरं, नेमकं काय हवंय, हे तरी आपल्याला कळतंय का? कधी आपण आपल्या अपयशाने खचुन जातो, तर कधी दुसऱ्याचं यश पाहून आपल्याला मनस्ताप होतो. काय करावं? याबाबतही अनेकांचा नुसताच गोंधळ आहे. ‘टु बी ऑर नॉट टु बी’ हा प्रश्न विचारणारा हॅम्लेट प्रत्येकाच्याच मनात क्षणोक्षणी आपले नाट्य सादर करीत असतो. या ताणतणावाने ग्रासलेल्या जीवनशैलीमुळे कित्येकांचं मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली तर ठीक, नाहीतर होणाऱ्या मनस्तापामुळे अनेकजण खचून जातात. वेडावाकडा निर्णय घेतात.  त्यामुळे हा मनस्ताप कमी करण्यासाठी आपण आपल्या मनाशी मैत्री केली पाहिजे. इतरांशी तुलना करून त्यांचा हेवा, मत्सर द्वेष करण्यापेक्षा आपण कसं जगतोय, याचं चिंतन केलं पाहिजे.
प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात त्याच्या पद्धतीनुसार जगत असतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यावर खूपदा तो नाखूष असतो. तथाकथित सुखाचा सदरा मला का नाही मिळाला ? असा गैरसमज करून घेत आपण आपल्या आयुष्याला दोष देत बसतो. मात्र, बरेच जण आपल्यासारखंच आयुष्य जगण्याचं स्वप्न रोज पहात असतात. मोटारीतून फिरणाऱ्या माणसाला विमानातून जाणाऱ्यांचा हेवा वाटतो, तर दररोज विमानात बसणाऱ्यांना मोटारीतून जावं वाटतं. हा सगळा मनाचा खेळ आहे. मनाच्या रस्त्याला भलतीकडे जाण्यापासून रोखले तर मनस्ताप होत नाही. 
मनस्ताप होण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अपेक्षा (EXPECTATION). आपण स्वतःपासून आणि इतरांकडून इतक्या अपेक्षा ठेवतो कि, वेळोवेळी आपला मनोभंग होतो. त्यामुळे वास्तवाचं भान ठेवून अवास्तव अपेक्षा ठेवणं थांबवलं पाहिजे. स्वत:च्या भावना जाणून घेऊन त्यानुसार काम करणं, हेदेखील मनःस्वास्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. एखादी परिस्थिती आपण बदलू शकणार नाही. मात्र, तिला सामोरं कसं जायचं, हे तर नक्कीच ठरवू शकतो. आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती आपलं मन आपल्याला देत असते. त्यामुळे मन ताब्यात असलं कि सगळं साध्य करणं अगदी सोप्प आहे.
मनाचा समतोल, संयम आणि मनाला लावलेलं योग्य वळणच आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतं, ही गोष्ट खरी असली तरी सोपी नक्कीच नाही. कारण मन हे अस्थिर आहे.वाऱ्यापेक्षा गतिवान आणि पाऱ्यापेक्षा गुळगुळीत असलेल्या मनाचा ठाव घेणे किंवा त्याच्यावर ताबा मिळवणे केवळ अशक्यच. मग आता तुम्ही म्हणाल, मनाला प्रसन्न करायचे म्हणजे नेमकं काय काय करायचं? 
असे विविध प्रश्न यानिमित्ताने मनात उठणे साहजिक आहे. पण, त्याचा फारसा ताण घ्यायचा नाही. मन प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कुठे जंगालत जाऊन तप करायचे नाही. तर दररोजच्या व्यवहारात आपण कसं वागतोय, कसं व्यक्त होतोय, याचं आत्मचिंतन करुन जरासे ‘स्व’ला म्हणजेचं मनाला ओळखण्याचा प्रयत्न करायचा. 'Life unexamined is not worth Living’ जे जीवन किंवा आयुष्य तपासून पाहिले जात नाही, ते जगण्याच्या लायकीचे नाही, असं सॉक्रेटिसचे एक वचन आहे. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याची चिकित्सा केली पाहिजे. आपली क्षमता, आपल्यातले प्लस पॉईंट, मायनस पॉईंट जाणून घेतले आणि त्यास सकारात्मक विचारांची झालर जोडली कि मनाला आपोपाप प्रसन्नता येते. शेवटी, सुख असो, यश असो, प्रगती असो, कि समाधान.. हे मानण्यावर आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारला कि उत्तर आपोआप समोर येते..!

No comments:

Post a Comment

ऑनलाइन शिक्षण - Future Investment !

  ऑनलाइन शिक्षण -  Future Investment ! शब्दांकन - प्राचार्य डॉ. सुजित टेटे  जर कोरोना  संपलाच नाही तर ?  जर शाळा २-३ वर्षे उघडल्याच नाही तर ...

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages